Beautiful, Historic and Extremely Enchanting Bedse Caves.

Beautiful, Historic and Extremely Enchanting Bedse Caves.

Sanjay Sawant , Navi Mumbai
महाराष्ट्रात प्रत्येक लेणींचे एकएक वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी सुंदर कलाकुसर आणि शिल्पे, तर काही ठिकाणी देखणा दर्शनी भाग (व्हरांडा), तर काही ठिकाणी अप्रतिम चित्रकला तर काही ठिकाणी वेधक वास्तुशिल्प ( Architectural View ) दिसून येते. मावळ तालुक्यातील बेडसा लेणी ज्यांनी पाहिली असेल त्यांनी तेथील अलौकिक कलात्मकता नक्कीच बघितली असेल. GBPP च्या गॅझेटमध्ये ( Gazetteer of the Bombay Presidency : Poona Part III ) लिहिले आहे की ‘सन १८४४ मध्ये या लेण्यांची पाहणी केली असता छताकडील लाकडी अर्धगोलाकार तुळव्या शाबूत दिसल्या. १८६१ मध्ये भेट देणाऱ्याने अशी नोंद केली आहे की लाकडी तुळव्यांचे तुटलेले तुकडे खाली पडले आहेत. भिंतीवर आणि स्तंभावर बुद्धचित्रे दिसत आहेत’. या वरून कळून येते की ब्रिटिश राजवटीत भारतातील लेणी, किल्ले अशा ऐतिहासिक स्थळांची नोंद घेतली जात होती व दाबून ठेवलेला दैदिप्यमान इतिहास उघडकीस येत होता.
अलौकिक कलाकुसर
“””””””””””””””””””””””””””
सन १८७९ मध्ये बेडसा लेण्यांचा पहिला फोटो हेनरी क्युसेन्स याने काढला आणि मग जगाला या सुंदर लेण्यांची माहिती झाली. त्यावेळी बेडसा गावाची लोकसंख्या अवघी २२० होती. या पूर्वाभिमुख लेण्या १ल्या शतकात सातवाहनांच्या काळात खोदल्या गेल्या. यासाठी नाशिकच्या आनंद श्रेष्ठींचां मुलगा पुसनाक यांनी दान दिल्याचा उल्लेख आहे. कार्ला आणि भाजे पासून दूरवर असलेल्या या बेडसा लेण्यांकडे जाण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे हायवे वरील कामशेत फाटा येथूनच जावे लागते. बेडसा गावाच्या शाळेजवळून डोंगराच्या दिशेने पाहिले असता लेण्यांचा छोटा नजारा दृष्टीस पडतो. पण जेंव्हा पायऱ्या चढून आपण लेण्यांपाशी पोहोचतो तेंव्हा त्याची भव्यता नजरेस पडते. या लेण्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. काळ्या कातळाच्या अरुंद खिंडीतून पुढे गेल्यावर कोरीव स्तंभ, नक्षीदार व्हरांडा, कातळाच्या भिंतीवरील चैत्यकमानी आणि स्तंभावरील वृषभ, हत्ती आणि अश्वावर स्वार झालेले युगुल पाहून माणूस मंत्रमुग्ध होतो. पिंपळ पानांची कमान, कोरलेली वेलबुट्टी, स्तंभाच्या शीर्ष भागातील उलटे कमळ आणि चौरंग तसेच पायाशी असलेले कुंभ पाहून हे लेणे वरून खाली कोरले कसे असेल असा मोठा प्रश्न पडतो. आजचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून देखील अशी कोरीव लेणी खोदता येणार नाहीत.
चैत्य आणि विविध चिन्हे
“””””””””””””””””””””””””””””'”
व्हरांडयातील कोरीवकाम पाहून स्तूप पाहण्यासाठी आत प्रवेश केल्यावर तेथील निरव शांतता पार मनाला भिडते. गुळगुळीत स्तंभ आणि त्यावरील नक्षीकाम पाहताना त्याकाळातील शिल्पकाराला हात जोडावेसे वाटतात. चैत्यगृहा मधील स्तूप आणि त्यावरील हर्मिका पाहून तेथेच डोळे मिटून बसले असता आंतरिक शांतता सर्वांनी अनुभवावी असे वाटते. तेथील स्तंभावर कोरलेले त्रिरत्न चिन्ह आणि धम्मचक्र ओळखता येते पण काही चिन्हांचा अर्थबोध होत नाही. या बाबत अनेकांनी ब्लॉगवर लिहिले आहे. येथील भित्तिचित्रे सन १८७१ पर्यंत शाबूत होती. पण अज्ञानामुळे चुना फासल्याने ती नष्ट झाली. चैत्यगृहाच्या बाहेर पडल्यावर उत्तरेच्या दिशेस पाण्याची कुंडे आणि मोठे विहार दिसते. तेथे भिक्खूंसाठी निवास कक्ष आहेत. बाहेर कातळात पाण्याचे कुंड आहे. येथील कुंडातील काठोकाठ भरलेले स्वच्छ थंडगार पाणी म्हणजे तहानलेल्यासाठीं अमृतकुंभच आहेत. यासाठी दान महादेवी सामदिनीका यांनी दिल्याचा तेथे उल्लेख आहे.
बुद्ध विहारासाठी योग्य स्थान
“”””””””””””””””””””””””””””””””””‘””
काही वेळेस वाटते की या लेण्यां आणि स्तुपांमुळेच बुद्ध धम्माचे अस्तित्व या भारतभूमीत टिकून राहिले असावे. पण इथल्या दरीत होत असलेले मातीचे खोदकाम पाहून काळजास घरे पडतात. मनुष्यप्राणी निसर्गाचा कसा नाश करतो हे पाहून वाईट वाटते. येथे जागा घेऊन मोठे बौद्ध विहार उभारले तर भारतातून आणि परदेशातून येणाऱ्या बौद्ध पर्यटकांसाठी नक्कीच हक्काचे स्थान होईल. मुंबई वरून एक्सप्रेस हायवेने पुण्यास जाताना लोणावळ्याच्या पुढे कामशेतचा जो पहिला मोठा बोगदा लागतो त्या डोंगरातच उजवीकडे या बेडसा लेण्या आहेत. ( मुंबईस येताना डाव्या बाजूस ) तरी बोगद्यातून जाताना त्याचे आवश्य स्मरण ठेवावे.
— संजय सावंत www.sanjaysat.in
Sanjay Sawant

Sanjay Sawant

Historian, Writer , traveler

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on telegram
Telegram
Share on whatsapp
WhatsApp

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat