
हजारो वर्षापूर्वी या बौद्ध लेण्या, चैत्य, स्तूप, विहारे आपल्या पूर्वजांनी तयार केली आहेत याचा आपल्याला अभिमान हवा आणि या बौद्ध स्मारकांचे आपण जतन केले पाहिजे.
:- आद. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब.(कमांडर-इन-चीफ , समता सैनिक दल. )
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात तळा तालुक्यामध्ये असलेले ऐतिहासिक बौद्ध लेणी म्हणजे कुडा बौद्ध लेणी हि होय. दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी कुडा बौद्ध लेणी या ठिकाणी समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर हे कुडा बौद्ध लेणी च्या माहिती फलकाचे लोकार्पण करण्यासाठी उपस्थित होते. लेणी वर उपस्थित असलेल्या बौद्ध उपासकांच्या उपस्थिती मध्ये कुडा बौद्ध लेणी च्या माहिती फलकाचे लोकार्पण करण्यात आले. उपस्थितीतांना बौद्ध धम्माचा वारसा जपण्याचे आवाहन करण्यात आले. आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी कुडा बौद्ध लेणी सोबत महाराष्ट्रातील असंख्य लेण्यांवर लेणीच्या माहिती फलकाचे लोकार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. ABCPR लेणी संवर्धक टीमसाठी हा आदेश शिरसावंद्य आहे.







कुडा बौध्द लेणी वर दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी माहिती फलकाचे लोकार्पण करण्यात आले. कुडा बौद्ध लेणी हि ऐतिहासिक बौद्ध लेणी असून इथे लावलेल्या माहिती फलकाची माहिती थोडक्यात नोंदवत आहोत.
संशोधन – रायगड जिल्यातील तळा तालुक्यातील कुडे हे गाव आहे. या गावाच्या पूर्वेला महोबा चा डोंगर आहे. या डोंगरात ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेणी आहे. ह्या लेण्यांचा प्रथम शोध १८४८ साली लागला. जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी लिहलेल्या Cave and temple of india या पुस्तकात त्यांनी नोंद केली आहे, कि हि लेणी पहिल्यांदा १८४८ साली उजेडात आली . १८५४ साली Rev J Stevenson यांनी कुडा लेणी मधील ९ मोठे शिलालेख प्रकाशित केले. सुरुवातीला अर्थ चुकीचे लावले गेले होते. शिलालेखांचे पुढे १८७८ साली H. Jacobi जे चांगले ज्ञात Epigraphist होते, त्यांनी शिलालेखांचे अर्थ बरोबर लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर मात्र १८८१ मध्ये जेम्स बर्जेस यांनी आणि भगवानलाल इंद्रजी जे Epigraphist होते व जेम्स बर्जेस हे भारतीय पुरात्तव विभागाचे दुसरे डायरेक्टर ऑफ जनरल होते, यांनी कुडा येथील ३१ शिलालेखांची माहिती तसेच लेणीची माहिती Archaeology survey of india vol IV Report on the Buddhist cave Temple and Their Inscription मध्ये शिलालेखांचे ठसे आणि शिलालेखाची व लेण्यांची माहिती लिहिली आहे. जेम्स बर्जेस यांच्या सोबत भगवानलाल इंद्रजी यांनी Archaeolgy surve of western india Inscription from The cave temple of western india with descriptive notes या पुस्तकात संस्कृत आणि इंग्लिश मध्ये भाषांतर केलेले आहे. Gazetteer of the Bombay Presidency Vol XI मध्ये कुडा लेणी ची माहिती आपणास मिळते. आता पर्यंत ब्रिटिश संशोधकांनी ३१ शिलालेखांचे संशोधन केले होते ABCPR लेणी संवर्धक युनिट समता सैनिक दल या लेणी संवर्धक टीम ने २३ डिसेंबर २०१८ रोजी लेणी क्रमांक ३ च्या उजव्या बाजूच्या पाण्याच्या टाक्यावर असलेला शिलालेखाचे संशोधन केले.
कालखंड – येथील शिलालेखांचा अभ्यास करताना शिलालेखाच्या लिपी वरून व शिलालेखात आलेल्या उल्लेखानुसार लेणीचा कालखंड पाहणे सोपे जाते. हि लेणी दोन विभागात विभागलेली आहे. १ ते १५ हे खालच्या स्तरावर आहेत तर लेणी क्रमांक १६ ते २७ हे वरच्या स्तरावर आहेत. लेणी चा कालखंड साधारण पणे इसवि सन पूर्व पहिल्या शतकातील आहे. तर इसवी चौथ्या शतका पर्यंत इथे लेणी ची निर्मिती होताना आपणास पाहायला मिळते. महाराष्ट्रात बहुतांश लेण्या ह्या इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० च्या आतमध्ये च कोरलेल्या आहेत. कुडा बौध्द लेणी येथील लेणी क्रमांक १ ,२ ,३,४,५ ,६,७,८, हे इसवी सन पहिले शतक ते इसवी सन तिसरे शतक तर लेणी क्रमांक ९,१०,११,१२,१३ ,१४ हे इसवी सन ते इसवी सन पहिल्या शतकात कोरलेली आहेत साधारण कालखंड इसवी सनाची सुरुवात ते इसवी सन १००. लेणी क्रमांक १६ ,१७,१८,१९, २१, २२, २३, २४, २५, २६, २७ हे इसवी सन १०० ते इसवी सन १८० शतकात कोरले असावी. लेणी क्रमांक १५ हे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात कोरलेले आहे. लेणी क्रमांक २१ हे अर्धवट कोरलेले चैत्यगृह आहे याचा कालखंड इसवी सन तिसरे शतकाचा उत्तरार्ध कोरलेले आहे. लेणी क्रमांक ६ मधील शिल्प हि इसवी सन चवथे ते पाचव्या शतकातील आहेत. तर हे चैत्य गृह गौतमीपुत्र यज्ञ सिरि सातकर्णी यांच्या काळातील आहे. कान्हेरी लेणी च्या लेणी क्रमांक ३ शी समकालीन आहे.
लेणी चे अंतरंग – कुडा बौद्ध लेणी सातवाहन यांचे मांदाड बंदरावरील अधिकारी महाभोज यांच्या अधिपत्याखाली बांधण्यात आलेली लेणी आहे. कुडा बौद्ध लेणी राजपुरी खाडी च्या पूर्वेला असलेल्या महोबाच्या डोंगरात कोरलेली आहे. या लेणी संकुलात एकूण २७ पूर्ण आणि अर्धवट राहिलेल्या लेण्या आहेत. इथे एकूण पाच चैत्यगृह, २२ विहार ११ पाण्याची टाकी आणि ३२ शिलालेख आहेत. लेणी क्रमांक १,६,९,१५ आणि २१ हि चैत्यगृह आहेत. लेणी क्रमांक ६ हे सर्वात मोठे चैत्यगृह असून इथे बुद्धांची शिल्प कोरलेली आपणास पाहायला मिळतील. धम्म चक्र प्रवर्तन मुद्रेतील भगवान बुद्धांच्या मुर्त्या दर्शनी भागात हि आणि आतील विहारातील भागात हि आहेत. लेणी ला समोर हत्तीच्या जोडीचे शिल्प असलेले आपणस पाहायला मिळेल. विविध प्राण्यांची शिल्प देखील लेणी मध्ये आढळून येतात.
शिलालेख – लेणी क्रमांक १ व ६ येथील शिलालेखांच्या अनुसार कुडा लेणी साठी मांदाड बंदरातून मांदव वंशाकडून मोठे योगदान मिळत होते एकूण च कुडा लेणी ला मांदव वंशाचा राजाश्रय असल्याचे निदर्शनास येते. लेणी क्र. सहा मध्ये शाक्य वंशातील भिक्खु यांनी बुद्ध मूर्ती धम्म दान देवून दीप लावण्यासाठी चेंडीन शेती दिल्याची नोंद आहे. लेणी क्र. सात मध्ये वैद्याच्या परिवाराने लेणीचे दान दिले आहे. लेणी क्र.९ एका ब्राह्मण उपसाकाच्या पत्नीने चैत्य गृहाचे धम्म दान दिले आहे. लेणी क्र.१० व १६ मध्ये सिवपिरीत आणि मृगद माळी यांनी लेणी व पाण्याचे टाके दान दिले आहे.. लेणी कर. १४ मध्ये कराड येथील लोहार समाजाचा उल्लेख आहे. लेणी क्र.१५ मध्ये महाभोज वेलीदत्त याच्या काळात रामदत्त आणि त्याच्या पत्नीने चैत्यगृह दान दिली आहे. लेणी क्र.१६ मध्ये स्थविर विजय याची शिष्या सपिला हिने तिच्या शिष्यासोबत लेणी धम्म दान दिली आहे. लेणी क्र. १७ मध्ये सार्थ वाहक स्वामिपुत्र नाग याने लेणी दान दिली आहे. लेणी क्र. १८ मध्ये श्रेष्ठी वसूलनाक याने लेणी दान दिली आहे. लेणी क्र. लेणी क्र. २३ मध्ये सार्थवाहक वेहमित्र याची पत्नी आणि पुसनाक याची आई सिवदत्ता हिने लेणी दान दिली आहेत. लेणी क्र. २४ मध्ये सार्थ वाहक अचलदास याचा मुलगा असालमित्र याने लेण्याचे आणि रस्त्याचे धम्मदान दिले आहे.
पुरातत्व विभाग – कुडा बौद्ध लेणी हि भारतीय पुरातत्व विभाग मुंबई मंडळाच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून नोंद आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियम १९५८ (२४) नुसार या लेणी ला राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणन घोषित करण्यात आले आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियम १९५९ (३२) नुसार स्मारकाची जागा संरक्षित करण्यात आली आहे.








प्राचीन बुद्ध लेण्या हे एक ऐतिहासिक प्राचीन साहित्य आहे. एक समृद्ध संपन्न सामाजिक आणि धार्मिक वारसा लाभलेली संस्कृती आहे. बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या साहित्याचा अभ्यास करूनच आम्हाला बुध्दाच्या मार्गावर चालायला शिकवले. शोषणाच्या, भेदभावपूर्ण समाजव्यवस्थेला एक निर्णायक धक्का दिला. हजारो वर्षे बुध्दतत्वज्ञानावर आधारित असलेल्या समाज व्यवस्थेशी परत एकदा ओळख करून दिली. हजारो वर्षे खितपत पडलेल्या पिचलेल्या, दडपलेल्या समाजातील लोकांच्या उर्जेला बुध्दविचाराने खडबडून जागे केले.
आज याच मार्गाने चालण्यासाठी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ आदरणिय भिमराव आंबेडकर आपल्याला सोबत घेऊन जात आहेत. ही गोष्ट खूप सुखावून जाणारी आहे.
भारतातील प्राचीन बौद्ध संस्कृतीची ओळख असणाऱ्या असंख्य हेरिटेज वास्तूंचा प्रदिर्घ आज अडगळीत पडलेल्या आहेत किंवा त्या जाणिवपूर्वक अडगळीत टाकल्या जात आहेत. त्या वास्तूंवरती सोयीसुविधांचा अभाव आहे. याठिकाणी सरकारी यंत्रणेच लक्ष वेधण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. भिमराव आंबेडकर नेतृत्व करत आहेत. याचाच एक भाग म्हणून काल रायगड जिल्ह्यातील तळा तालुका भारतीय बौद्ध महासभा, एकजूट लेणीसंवर्धक, समता सैनिक दल लेणीसंवर्धक युनिट यांचा संयुक्त आणि ऐतिहासिक कार्यक्रम तळा तालुक्यातील कुडा येथे पार पडला.
या कार्यक्रमात उपस्थित लोकांची संख्या ही लेणी संवर्धन उपक्रमाला प्रोत्साहन देणारी आहे. भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते सोबत राष्ट्रीय अध्यक्ष आद. भिमराव आंबेडकर आणि आद. भिकाजी कांबळे जी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभा हे ही उपस्थित होते.
सह्याद्रीमुळे रायगड जिल्ह्याला लाभलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि त्यातून निर्माण झालेल्या कातळ शिल्प, बुध्दलेणीचे स्थापत्य, भित्तीचित्रे, शिलालेख यामुळे या जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कोंडाणे, कुडा, महाड, ठाणाळे, नेणावली बुध्दाच्या प्रेमाचा संदेश देणार्या ऐतिहासिक लेण्यांच्या अस्तित्वामुळे रायगड जिल्ह्याला एक महत्त्वाचा वारसा लाभलेला आहे. हा वारसा टिकून रहावा लेण्यांच महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक ९ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा दिपोत्सव साजरा करण्यात आला.
१० सप्टेंबर रोजी आद. भिमराव आंबेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक गोष्ट आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून होत असलेल्या धम्माचा प्रसार आणि धम्म ज्या अस्तीत्वावरती टिकून आहे त्या प्राचीन बुद्ध लेण्या अतिक्रमण मुक्त आणि विकृतिच्या विळख्यातून सोडवल्या जाव्यात यासाठी असलेली आत्मीयता आद. भिमराव आंबेडकर साहेबांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होती.
ऐतिहासिक प्राचीन लेण्यांच महत्व आपण जाणतोच पण फक्त जाणून उपयोग नाही तर त्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखण्याची गरज आहे. त्या लेण्यांच ऐतिहासिक महत्त्व आणि प्राचीनत्व जपण्यासाठी लोकांनी पुढं येणं गरजेचं आहे. ही एक गरज नाही तर लेण्यांमध्ये चाललेल्या अतिक्रमणाविरुध्द आणि विकृतिकरणाविरुध्द एक सामाजिक आणि एकत्रित चळवळीचा भाग म्हणून बघीतले पाहिजे.