आपला महाराष्ट्र देश सुद्धा १०० टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील. भारतात दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत 

:- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

स्थळ : देहूरोड , दिनांक : २५ डिसेंबर १९५४ , सोर्स जनता १ जानेवारी १९५५ 

इतिहास हा प्रत्येक देशाचा आरसा असतो. जो आपल्याला आपला भूतकाळ सांगत असतो. तथागत बुद्धांच्या रूपाने या देशाला एक प्रगतीचा मार्ग दाखवणारा इतिहास मिळाला. आणि हजारो वर्षे हा देश जगावर अधिराज्य गाजवत होता. जो समाज जी व्यक्ती आपला इतिहास विसरते ते पुन्हा इतिहास घडवू शकत नाही हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यासाठी च म्हटलेले आहे कि आपला इतिहास ओळखायला शिका. भारत हा बौद्धमय असल्याचे इतिहासात पाहायला मिळते. अगदी सोन्याचा धूर निघत होता अशी ओळख होती. कारण बौद्ध इतिहासाने अजरामर झालेला हा प्रदेश होता. आज या देशात केवळ स्मारके जिवंत आहेत आणि म्हणून च तो इतिहास या स्मारकात जिवंत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध स्मारकांची भेटी घेत बौद्ध इतिहास किती महत्वाचा आहे हे सांगितले आहे. बाबासाहेब अर्थशास्त्राचे प्रकांड पंडित होते त्यामुळे बौद्ध इतिहासाने जगात कोणते अर्थशास्त्र निर्माण केले याची माहिती बाबासाहेब यांना होती.
या देशात साधारण २००० लेण्यांचा वारसा आहे व असंख्य स्तूप आणि विहारांचा दैदिप्यमान वारसा लाभला आहे त्यापैकी बहुतांश लेणी स्तूप विहार हि महाराष्ट्रात सापडतात हेच या महाराष्ट्राचे खरे वैभव आणीन खरा इतिहास आहे. आज हि स्मारक दुर्लक्षित आहेत अतिक्रमण झाले आहे अश्यावेळी आमचा धम्माचा इतिहास च अतिक्रमित झाला आहे आता आपल्याला १९५६ ला दिलेली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे यासाठी प्राचीन बौद्ध लेण्यांचे संवर्धन आणि संशोधन करणे काळजी गरज आहे . कारण हा इतिहास आहे आणि इतिहास च नवीन इतिहास घडवू शकतो म्हणून इतिहासाला समजून नवीन इतिहास घडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
या देशात बौद्ध स्मारकाचे संवर्धनाची चळवळ खूप प्राचीन आहे सम्राट अशोकाने ती सुरु केली असून अनेक सम्राट यांनी ती खांद्यावर पेलली देखील मध्यंतरी हि मालिका खंडित झाली आणि आपला वारसा दुसर्याने काबीज केला त्यावर अतिक्रमण केले पण १९५६ ला पुन्हा ती सुरु झाली ती बाबासाहेब यांच्या रुपात आणि आज ती आपल्या खांद्यावर आहे त्यामुळे ती आता जबाबदारी आपली आहे. संवर्धन कशाला तर बुद्धाच्या धम्माची शिकवण या प्रत्येक माणसाला दुःखमुक्त करण्यासाठी आहे म्हणून हि स्मारके ह्या लेण्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगतात म्हणून बुद्ध लेण्यांच्या संवर्धनातून धम्म संवर्धन करत प्रगती कडे वाटचाल करण्यासाठी हि चळवळ आहे .
संविधान निर्माते विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना. विशेष महत्व या प्राचीन स्मारकांना हि दिलेले आपणास पाहायला मिळते. अनुच्छेद ४९ नुसार राष्ट्रीय महत्वाची स्थान स्मारक आणि वस्तू यांचे संरक्षण करणे जे संसदेच्या द्वारे विधी द्वारे तसेच त्याच्या आधीन असणारे आणि घोषित केलेले राष्ट्रीय स्मारक कलात्मक आणि ऐतिहासिक वस्तूंचे रक्षण करण्याचे कायदेशीर तहविज आपणास पाहायला मिळते. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकाला अनुच्छेद २९ नुसार आपली भाषा आपली लिपी आणि आपली संस्कृती जतन करण्याचा जपण्याचा कायदेशीर अधिकार भारतीय संविधानाने देवू केलाय. ह्याच आधारावर भारताच्या ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याची जबाबदारी हि आपली आहे हे आम्ही प्रत्येक बौद्ध बांधवाने समजून घेणे आवश्यक आहे. स्मारकांच्या बाबतीत कायदेशीर तरतुदी आम्ही समजून घेणे आवश्यक आहे तर च आम्हाला ते स्मारक जतन करण्यासाठी काय लागते याची कल्पना येईल.

याच संविधांनाच्या तरतुदी नुसार २८ ऑगस्ट १९५८ रोजी प्राचीन संस्मारक, पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष अधिनियम अंमलात आणला गेला. या अधिनियमात राष्ट्रीय महत्वाचे प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक व पुरातन स्थळ व अवशेषांचे संरक्षण व संवर्धन करणे, पुरातन उत्खननांचे जतन करणे आणि मूर्ती, नकाशे आणि इतर अशा प्रकारच्या वस्तूंचे संरक्षण व संवर्धना करण्याची तरतूद कलेली आहे त्याच प्रमाणे प्राचीन सस्मारक व पुरातन स्थळ व अवशेष नियम, १९५९ साली तयार करण्यात आले. यामध्ये १९५८ च्या कायद्यामध्ये २०१० साली नवीन बदल करण्यात आले आणि त्यानुसार The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains (Amendment and Validation) Act, २०१० हा कायदा पारित करण्यात आला. ह्या कायद्याच्या नुसार स्मारकाच्या चारी बाजुला १०० मीटर चे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले या परिसरात कोणत्या हि प्रकारचे शासकीय तसेच व्यक्तिगत बांधकाम करता येत नाही किंवा कोणते हि खोदकाम करता येत नाही तसेच १०० मीटर च्या पुढे २०० मीटर चा परिसर हा नियमन परिसर म्हणून घोषित असतो इथे कोणते हि बांधकाम व्यक्तिगत अथवा शासकीय तसेच कोणते हि खोदकाम करण्यासाठी परवानगी ची आवश्यकता असते. या एकूण ३०० मीटर मध्ये कोणते बांधकाम तसेच खोदकाम केल्यास अथवा स्मारकाची हानी केल्यास AMASR (Amendment and Validation) Act, २०१० कलम ३० या कायद्यानुसार दोन वर्षाची जेल आणि एक लाख रुपायचा दंड भरावा लागतो. भारताच्या राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या कोणत्या हि स्मारकाचे जर AMASR (Amendment and Validation) Act, २०१० कलम २९ ब नुसार उत्खनन पूर्ण झाले नसेल तर ३०० मीटर चा प्रदेश पूर्णपणे संरक्षित केला जातो. यामध्ये कोणते हि बांधकाम करता येत नाही. भारताच्या संविधानाने दिलेल्या ह्या ऐतिहासिक स्मारकाचे जतन करण्याचे महत्वपूर्ण काम आम्हा भारतीय बौद्ध जनतेने तरी समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद ४९ नुसार भारतीय स्मारकाचे जतन करण्याचे काम राज्य शासनाचे असते प्रत्येक स्मारकांचा सातबारा तयार करण्याचे काम करणे तसेच प्रतिबंधक क्षेत्र आणि नियमन क्षेत्र घोषित करून स्मारकाचे संवर्धन करण्याचे काम केले जावे. AMASR (Amendment and Validation) Act, २०१० मध्ये २०१७ मध्ये पुन्हा संशोधन करण्यात आले आणि त्यामध्ये १०० मीटर या प्रतिबंधित क्षेत्रात हि शासकीय कामांसाठी बांधकाम करण्याची परवानगी देण्याचे संशोधन करण्यात आले आहे. भारतीय संविधान अनुच्छेद २९ नुसार आणि AMASR (Amendment and Validation) Act, २०१० नुसार भारतीय स्मारकाचे जतन करण्याचे काम प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे अधिकार हे भारतीय नागरिकांना आहे. AMASR (Amendment and Validation) Act, २०१० कलम १६ (२) नुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जेथे भारत सरकारने प्राचीन स्मारक संरक्षित केले आहे किंवा कलम 13 अंतर्गत स्मारक किंवा महासंचालक, भारतीय पुरातात्विक सर्वेक्षण, भारत सरकार यानी खरेदी केली आहे त्याचा कोणताही भाग कोणत्याही समुदाया द्वारे धार्मिक पूजे साठी वापरला जात असेल, तेव्हा ह्या कलमा अंतर्गत जिल्हाधिकारी “त्या धार्मिक समुदायाची समिति” बनवून प्रदूषण किंवा विद्रुपन होण्या पासून स्मारकाचे संरक्षण करेल. अश्या प्रकारची तरतूद हि या कायद्यात केलेली आहे.
प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन अर्थात ABCPR लेणी संवर्धक टीम या ऐतिहासिक स्मारकाचे जतन करताना धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी काम करत आहे.