Triratna Emblem on Three Gate at Panhala Fort

पन्हाळ्यावर तीन दरवाजा येथे त्रिरत्नांचे प्रतीक

कोल्हापूर येथील पन्हाळा किल्ला हा इ.स.११७८ ते १२०९ या काळातील शिलाहार राजवटीतील दुसरा भोज राजा याच्या काळात बांधला गेला. साताऱ्यात मिळालेल्या ताम्रपटावरून दिसून येते की पन्हाळा येथे राजा भोज यांचा दरबार भरत असे. पुढील काळात हा किल्ला देवगिरीचे यादव यांच्या ताब्यात गेला. त्यानंतर अनेक राजवटी या किल्ल्याने बघितल्या. सन १६५९ नंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. पुढे सन १८४४ नंतर पवनगड, पन्हाळा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. दक्खन पठारावरील हा सर्वात मोठा किल्ला असून अनेक राजवटीत या किल्ल्याचे नुतनीकरण झाले.
मुळात किल्ला शिलाहार राजवटीत बांधला गेल्याने काही जुन्या बुरुजांवर हजारो वर्षांपूर्वीची कलाकुसर दिसून येते. कोंकण आणि घाटावरील शिलाहार घराण्यातील अनेक राजे हे बौद्ध, जैन आणि हिंदू पंथाचे पाठीराखे होते. शिलाहार हे नावच मुळी बौद्ध संस्कृतीचे असून शैलहारा, शैलविहार या शब्दातून त्याची उत्पत्ती झाली आहे. महामायादेवी उर्फ महालक्ष्मीदेवी शिलाहार घराण्याची परंपरेने चालत आलेली कूलदेवता होती. यांची पूर्वीची राजधानी कऱ्हाड येथे होती असे मिरजेच्या ताम्रपटावरून दिसून येते. आगाशिव, भैरव, डोंगराई या कऱ्हाडच्या बौद्ध लेण्यां त्यांच्या अगोदरच्या काळापासूनच अस्तित्वात असल्या तरी भरभराटीला आल्या होत्या. पुढे शिलाहार यांनी राजधानी कोल्हापूर जवळील पन्हाळा डोंगरावर नेली. तेथे देखील पोहाळे या थेरवादी पंथीय लेण्यांची निर्मिती ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी झाली होती. थोडक्यात त्याकाळच्या बौद्ध संस्कृतीचा ठसा किल्ल्यांच्या निर्मितीमध्ये नक्कीच झाला असावा.
पन्हाळा किल्ल्यात तीन दरवाजा येथे काही नक्षीकाम केलेल्या कलाकृती दिसून येतात. त्यातील एक कलाकृती म्हणजे बौद्ध संस्कृतीचे त्रिरत्न वाटते. भारतातील प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या स्थळीं असलेले त्रिरत्नांचे प्रतीक व या पन्हाळाच्या तीन दरवाजा स्थानी असलेले प्रतीक एकच वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे याच ठिकाणी त्रिरत्नाखाली दोन कमलपुष्पे देखील कोरलेली आढळतात. कमलपुष्प आणि बौद्ध संस्कृतीचा अतूट संबंध आहे. त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी किल्ला बांधताना केलेल्या कालाकुसरीवर बौद्ध संस्कृतीचा पगडा नक्कीच असावा असे अनुमान काढता येते. शिलाहारा नंतर अनेक राजवटीत किल्ल्याची डागडुजी करताना व युद्धात झालेल्या तोफांच्या माऱ्यात असंख्य कलाकृती नष्ट झाल्या असाव्यात. तरी बौद्ध वास्तू शिल्पदृष्टीने देखील संशोधकांनी विचार केला पाहिजे, असे वाटते. जे सत्य दिसले तेच येथे मांडले आहे. तरी वाचकांनी त्यांची मते जरूर कळवावीत.
— संजय सावंत ( नवी मुंबई ) https://sanjaysat.in

Leave a Reply